बुधवार, २९ जुलै, २०१५

स्‍वावलंबन

कथा क्र.228

एक माणूस कामासाठी दुस-या शहरात गेला. प्रवासात त्‍याची काही लोकांशी ओळख झाली. तेही कामानिमित्ताने त्‍याच शहरात चालले होते. त्‍यांच्‍यापैकी काहीजण पायी तर काही घोड्यावर स्‍वार होते. बोलत चालले असताना एका घोडेस्‍वाराच्‍या हातून चाबूक खाली पडला. त्‍या व्‍यक्तिने त्‍या घोडेस्‍वारास खाली उतरू न देता, चाबूक देण्‍याची तयारी दर्शविली पण त्‍या सहका-यास नम्रपणे नकार देत स्‍वत: खाली उतरून त्‍या घोडेस्‍वाराने चाबूक स्‍वत:च हातात घेतला.
खालून मदत करणा-या व्‍यक्तिने याचे कारण घोडेस्‍वारास विचारले असता घोडेस्‍वार उत्तरला,''आपण ज्‍यावेळी घोड्यावर बसतो तेव्‍हा चाबूक आपणच सांभाळावा लागतो. आपण प्रत्‍येक गोष्‍टीत स्‍वयंपूर्ण राहिलो तरच आपल्‍याला यशाची खात्री आहे असे समजावे.''

तात्‍पर्य :- कुणावरही विसंबून न राहता स्‍वावलंबनाचा स्‍वीकार केल्‍याने यश मिळतेच.

बुधवार, २२ जुलै, २०१५

सवय

कथा क्र.227

एका माणसाने त्‍याच्‍या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्‍या पोपटाला चांगले खायलाप्‍यायला मिळत असे व पोपट बोलका असल्‍याने घरातील लोकांकडून त्‍याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्‍या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्‍य दाटून येई. अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्‍या माणसाने पोपटाला खाणे देण्‍यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्‍याच्‍याहातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्‍याने तो ते
दार उघडे टाकून निघून गेला असता
पोपट पिंज-याच्‍या बाहेर निघून गेला. पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्‍याने त्‍याला फारसे नीट उडताच येत नव्‍हते. एका झाडावर गेला असता त्‍याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्‍याने त्‍याला पोपटांची भाषा येत नव्‍हती म्‍हणून इतर पोपटही त्‍याला सहकारी मानत नव्‍हते. पिंज-यात आयते खायची सवय असल्‍याने त्‍याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्‍याने तो आजारी पडला व
मरून गेला.

तात्‍पर्य : - जास्‍त काळ पारतंत्र्यात(गुलामगिरीत) राहिल्‍याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्‍कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्‍वातंत्र्य टिकवण्‍यासाठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्‍या संस्‍कृतीचे चांगले काही घेताना आपल्‍या संस्‍कृतीचे विस्‍मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा.