रविवार, २३ डिसेंबर, २०१२

कवी


 (कथा क्र.६)
उज्जैन येथे एकदा खूप पाउस पडत होता. सारे शहर झोपले होते. मात्र राजवाड्याचा द्वारपाल मातृगुप्त जागाच होता. तो पहारा देत आपल्या दुर्भाग्याचा विचार करत होता. कारण तो एक असाधारण काव्यप्रतीभेचा धनी होता. राजा विक्रमादित्य गुणीजनांचा सन्मान करतो हे ऐकून तो येथे आला होता. परंतु राजाची त्याची भेट झाली नसल्याने त्याला द्वारपालाचे काम करावे लागत होते. त्याच रात्री भर पावसात राजा विक्रमादित्य गुप्त वेशात राज्यात पाहणी करावयास निघाले होते. द्वारावर येताच त्यांच्या कानी कुणीतरी काहीतरी गुणगुणल्यासारखे वाटले म्हणून त्यांनी थांबून ऐकले तर मातृगुप्त एक कविता म्हणत होता. त्यांनी त्याला विचारले अरे तू आता पहाऱ्यावर आहे ना? मग हि कविता कोणाची म्हणतोस? त्याने उत्तर दिले, हि कविता माझी आहे आणि या कवितेत मी राज्याची परिस्थिती वर्णन केली आहे. राजे तिथून काहीच न बोलता निघून गेले. दुसऱ्या दिवशी त्यांनी मातृगुप्ताला दरबारात बोलावले व त्याच्या हाती एक पत्र देत त्याला काश्मीरला जायला सांगितले. मातृगुप्ताने फारशी चौकशी न करता ते पत्र घेवून काश्मीरला प्रयाण केले. काश्मीरला पोहोचताच तेथील पंतप्रधानांनी ते पत्र वाचून पाहिले व मातृगुप्ताला काश्मीरचा राजा म्हणून घोषित केले. या गोष्टीचे त्याला खूप आश्चर्य वाटले. त्यावर पंतप्रधान म्हणाले, राजांनी तुझ्या कर्तव्य बुद्धी बरोबरच तुझी राष्ट्रनिष्ठा व काव्यप्रतिभा पाहिली म्हणून त्यांनी तुला येथील राजा केले आहे.

तात्पर्य- प्रतिभा आणि योग्य वेळ, योग्य माणूस यांचा संगम झाला तर प्रतिभेचे चीज होण्यास वेळ लागत नाही.

वर्तमानपत्रातून संग्रहित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा