(कथा क्र. २० )
वाराणसीत एका पंडिताचा मोठा आश्रम होता. तेथे ते आपल्या शिष्यांना शिक्षण देत असत. त्यांच्या या आश्रमासमोर एक सुतार काम करत असे. तो आपले काम करीत असताना मधुर भजनही गात असे. पंडितजी मात्र भजनाकडे लक्ष देत नसत. काही दिवसानंतर पंडितजी खूप आजारी पडले. हळूहळू त्यांचे अर्ध्यापेक्षा शिष्य आश्रम सोडून गेले. काही सेवाभावी शिष्य पंडितजींचे काम चालवत होते आणि पंडितजी अंथरुणावर पडल्या पडल्या सुताराचे भजन ऐकत असत आणि त्यांना ते आवडायचेही. हळूहळू त्यांचे लक्ष भजनावर केंद्रित होवू लागले. एके दिवशी त्यांनी त्या सुताराला प्रथमच आपल्या शिष्याकरवी आश्रमात येण्याचे आमंत्रण दिले. सुतार आश्रमात आला. पंडितजींनी त्याला आपल्या जवळ बसविले व म्हणाले,"अरे मित्रा! तू किती सुंदर भजन गातोस! साक्षात देवाने तुला वरदहस्त दिला आहे असे वाटते, तुझ्या या सुंदर भजन गाण्याने माझा आजार आता खुपसा कमी झाला आहे. यासाठी मी तुला काही देवू इच्छितो." असे म्हणून त्यांनी त्याला शंभर रुपये दिले व सांगितले कि तू असाच दैवी आवाजात भजने गा. सुतार पैसे बघून खूप खुश झाला. त्याचे त्या पैशांमुळे कामावरून लक्ष उडाले. सारखे त्या पैशांची काळजी घेण्यात त्याचा वेळ जावू लागला. पर्यायाने त्याचे भजन गाण्याकडे हि दुर्लक्ष झाले. तो रात्रंदिवस याच चिंतेत होता कि, "हे एवढे पैसे मी कोठे ठेवू ?" अश्याने त्याचे ग्राहक कमी कमी होत गेले. एके दिवशी तो परत पंडितजींकडे गेला व त्यांना शंभर रुपये परत करत म्हणाला ,"पंडितजी! हे परक्याचे धन आहे. त्यात ते विनाकष्टाचे आणि बक्षीस स्वरूपातील आहे. त्याला कष्टाच्या कमाईची गोडी नाही. तेंव्हा हे परत घ्या." असे बोलून तो तेथून निघून गेला. दुसरे दिवशी पंडितजींना सुताराचे सुरेल भजन ऐकू आले.
तात्पर्य- विनाकष्टाचे धन अशांततेचे कारण असते. कष्टाची कमाई मनाला सुख देते आणि आनंदही ! खरेय ना!
वर्तमानपत्रातून संग्रहित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा