गुरुवार, २१ मार्च, २०१३

(भाऊबीज)


(भाऊबीज)

एका गावात एक बहिण भाऊ राहत होते. बहिणीचे आणि भावाचे दोघांचीही लग्ने झाली होती. बहिण तिच्या घरी सुखाने नांदत होती. भावाच्या सुखातसुद्धा काही कमी नव्हती. भाऊबीजेचा सण होता. आज माझा भाऊ जेवायला येणार म्हणून बहिणीने सगळी तयारी केलेली होती. स्वैपाकपाणी आवरून दारात उभी राहून ती भावाची वाट पाहत होती. बराच वेळ झाला तरी भाऊ आला नाही, तेवढ्यात दारी दोन याचक भिक्षा मागण्यास आले. बहिणीने सणाच्या दिवशी याचक न जेवता जाणार म्हणून तिने त्या दोघांना जेवायला वाढले, दोघे याचक पोटभर जेवले. बहिणीला त्यांनी सांगितले,"ताई !आज सणाचा दिवस! तू आम्हाला जेवण दिले. आम्ही याचक नसून यमाचे दूत आहोत आणि यमआज्ञा अशी आहे कि आजपर्यंत ज्या पुरुषाला कुणी शिव्या दिल्या नाहीत, त्याला घेवून ये असे यमराज म्हणाले आहेत. तू आमचा आत्मा तृप्त केला म्हणून आम्ही तुला हे गुपित सांगत आहोत." एवढे बोलून ते निघून गेले. दुतांचे बोलणे ऐकताच बहिण मनातून खूपच घाबरली कारण ती व तिचा भाऊ हे गावात अजातशत्रू म्हणून ओळखले जात. त्यामुळे या दोघांना कुणी शिव्या देण्याचा प्रसंगच उद्भवला नाही. आपल्या भावावर आज मरणाची छाया दिसताच तिने घराबाहेर धाव घेतली व तिला जितक्या म्हणून शिव्या येत होत्या त्या भावाच्या नावाने देण्यास सुरुवात केली.गावातील लोक चकित झाले, ज्या बहिणी भावाच्या मायेची उदाहरणे साऱ्या पंचक्रोशीत दिली जात होती त्या भावाची बहिण आज त्याला रस्त्याने शिव्या देत सुटली होती. हि बातमी भावापर्यंत पोहोचली, भावाला ज्याने हि बातमी दिली त्याला भाऊ म्हणाला," मित्र ! माझी बहिण मला शिव्या देते आहे यातसुद्धा माझे काहीतरी हित तिने पाहिले आहे." शिव्या देत देत बहिण भावाच्या दाराशी आली, तो यमाचे दूत भावाच्या दारात उभे होते. त्यांना पाहताच बहिणीने भावाच्या नावाने शिव्यांचा शिमगा केला. हे ऐकताच यमाचे दूत त्यांच्या नियमानुसार निघून गेले. बहिण भावाकडे गेली व भावाला शिव्या देण्याचे गुपित सांगितले. एका बहिणीने शिव्या देवून भावाचा अपमृत्यू टाळला होता.


तात्पर्य- (या कथेचे तात्पर्य कृपया तुम्हीच कॉमेंट मध्ये सांगावे हि विनंती)

1 टिप्पणी: