मराठीत ऐकलेल्या, वाचलेल्या काही निवडक बोधकथांचा एक संग्रह.
मंगळवार, २३ जुलै, २०१३
बोध
(कथा क्र.110)
राज्यकारभारापेक्षा इतर अवांतर गोष्टीत रस घेणाऱ्या एका राजाने आपल्या सेनापतीला दोन प्रश्न विचारले व उत्तरे देण्यासाठी त्याला एका आठवड्याची मुदत दिली. सेनापतीने आपल्याच चेहऱ्य मोहोऱ्याच्या आपल्या एका सेवकाला आपला पोषाख घालायला देऊन, आणि त्या प्रश्नांची उत्तरे पढवून, राजाकडे पाठविले. ‘हा आपला सेनापतीच आहे’ अशा समजुतीनं राजानं त्याला विचारलं, ‘काय सेनापतीसाहेब ? मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तयार आहेत का ?’ नकली सेनापती म्हणाला, ‘महाराज ! ते प्रश्न आपण पुन्हा विचारलेत तर बरे होईल.’ राजा – समोरच्या पर्वताची माती एकूण किती टोपल्या होईल ? नकली सेनापती – त्या पर्वताच्या एकूण क्षेत्रफ़ळाच्या एक दशांश आकाराची जर एक टोपली बनवली, तर त्या पर्वताची एकूण माती दहा टोपल्या होईल. राजा – वा: ! अगदी बरोबर आहे उत्तर. सेनापतीसाहेब ! आता माझ्या मनात काय आहे ते सांगा. नकली सेनापती – सध्या तुमच्या मनात तुम्ही सेनापतीशी बोलत आहात असं आहे; पण मी खरा सेनापती नसून, सेनापतीच्या सोंगात तुमच्याकडे आलेला सेनापतीसाहेबांचा नोकर आहे. राजा – मग तुम्ही दोघांनी मला असं का फ़सवलं ? नकली सेनापती – माझ्या धन्याचं असं म्हणणं आहे की, जे माणसं मोठ्या पदांवर आहेत, त्यांनी मनोरंजनाच्या भलत्यासलत्या गोष्टीत वेळ वाया घालवू नये. राजाचं कर्तव्य राज्य उत्तम त-हेनं चालविण हे आहे, तर सेनापतीचं कर्तव्य राज्याचं उत्तम त-हेनं रक्षण करणे हे आहे. अशा अशा स्थितीत आपण त्यांना नसते प्रश्न विचारुन त्यांच मन त्यांच्यापुढे असलेल्या मुख्य प्रश्नांवरुन उडवून भलत्याच प्रश्नांकडे वेधता. त्यांना आपलं हे वागणं मान्य नसल्यामुळे, त्यांनी आपल्या मामुली प्रश्नांची उत्तर देण्यासाठी माझ्यासारख्या मामुली सेवकाला सेनापतीचं सोंग घेऊन पाठविलं.’ नकली सेनापतीच्या या खुलाशानं राजा वरमला आणि मनोरंजनाच्या बाबींतून लक्ष काढून त्याने ते राज्यकारभारात घातले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा