मराठीत ऐकलेल्या, वाचलेल्या काही निवडक बोधकथांचा एक संग्रह.
गुरुवार, १३ जून, २०१३
(सम्राट आणि साधू)
(कथा क्र. ९३)
एक सम्राट रात्रीच्या वेळी राजधानीत फेरफटका मारीत असे आणि काय चालले आहे याचा आढावा घेत असे. फेरफटका मारत असताना सम्राटाला एक साधू जागा असलेला दिसायचा. त्याच्या कुटीत पाण्याचे मडके आणि दोन कपडयाशिवाय काहीच नव्हते तरी तो ‘’जागे रहा, झोपू नका, नाहीतर लुटले जाल’’ असा जोरजोरात आवाज देत असायचा. सम्राटाला वाटले हा साधू वेडा आहे मात्र त्याच्याशी एकदा बोलायला हवे. सम्राटाने एके दिवशी त्याला विचारले,’’तुमच्याकडे धनदौलत, गाडीघोडा, संपत्ती वगैरे काहीही नसतानासुद्धा तुम्ही इतके का जागता आणि सावधान राहता,’’ साधू म्हणाला,’’ राजा, आपण आपल्या महालात जो कचरा जमा केला आहे की, तो जर लुटला गेला तर काही फरक पडणार नाही, कारण आपण तो परत मिळवू शकता, परंतु या माझ्याकडे जे धन आहे ते लुटले गेले तर ते परत मिळणार नाही.त्यामुळे मी सदैव सावध राहतो.’’ राजा म्हणाला,’’ माझ्याकडे असलेल्या हत्ती घोडे, हिरे दागिने, सोने चांदी याला तुम्ही कचरा समजत आहात’’ साधूने उत्तर दिले,’’ ज्याला आपण अमूल्य समजत आहात ते धन, संपत्ती, हत्तीघोडे, राजवाडा कोणीही तुमच्याकडून हिसकावून घेऊ शकते पण माझी संपत्ती ही ईश्र्वरदत्त आहे. त्यामुळे मी स्वत:ला सावधान करतो, माझ्या मनात मोह, लोभ, मद, मत्सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांचा प्रवेश होऊ नये, अर्थात माझे मन हे ईश्वराने दिल्याप्रमाणे, लहान बालकाप्रमाणे कोरे असावे. या मानवी दुर्गुणांचा स्पर्श जर माझ्या मनाला झाला तर माझे कर्म बिघडेल आणि माझ्याकडून पाप घडेल. म्हणून मी रात्री स्वत:लाच सांगत असतो नव्हे माझ्या आत्म्याला सांगत असतो झोपू नको, तू झोपलास तर हे विषय तुझ्यावर आक्रमण करतील व तुला गिळंकृत करतील.’’ साधुचे ते विचार ऐकून राजा त्याचे चरणी लीन झाला व साधुला गुरुस्थान दिले.
तात्पर्य- मोह, लोभ, मद, मत्सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांची संगत न घेता जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर जीवन सुखकर होते. वाईटापासून आपले संरक्षण होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा