एक तपस्वी जंगलात आपल्या शिष्यांना शिक्षण देत होता. परंतु तो अत्यंत क्रोधी स्वभावाचा होता. एकेदिवशी तो रागाने आपल्या शिष्याला मारायला धावला मात्र तो मार्गात असलेल्या एका खांबाला धडकला आणि त्याचा मृत्यू झाला. मृत्युनंतर तो आपल्या तपोबलाच्या जोरावर पुन्हा जिवंत झाला. त्याचे नाव होते चंडकौशिक. त्याच्या आश्रमाच्या बगिच्यात फूल तोडण्यासाठी काही लोक घुसले होते. चंडकौशिकला हे समजले तेव्हा तो तात्काळ तेथे गेला. त्याला पाहताच लोक पळून गेले. चंडकौशिकला प्रचंड राग आला होता. तो कु-हाड घेऊन त्यांना मारायला धावला मात्र रागाच्या आवेशात येऊन विहीरीत पडला आणि त्याचा मृत्यू झाला. प्रचंड रागाच्या काळात मृत्यु होण्याच्या कारणांमुळे तो पुढच्या जन्मात तो भयानक विषारी साप बनला. भीतीपोटी लोकांनी तो ज्या वनात आहे तेथे जाणेच सोडून दिले. एकदा भगवान महावीर त्या जंगलात आले. लोकांनी त्यांना त्या वनात न जाण्याची विनंती केली. परंतु ते निर्भिडपणे गेले. महावीरांना पाहताच सापाने फुत्कारणे सुरु केले. परंतु महावीर त्याच्या बिळापाशी उभे राहिले. क्षमा आणि क्रोधाचा संघर्ष सुरु झाला. सापाने महावीरांच्या पायाचा कडाडून चावा घेतला. तर तेथून दुधाची धार सुरु झाली. साप हरला. तेव्हा महावीरांनी त्याला समजावले, ‘’ मित्रा, आता जरा जागा हो. जरा विचार कर, प्रत्येक जन्मात तू क्रोधाने इतरांना त्रास दिला आणि त्याबरोबरच स्वत:चेही नुकसान करून घेतले. क्रोधाने तुला काहीच मिळाले नाही उलट तू जे काही पुण्याईने मिळवले होते ते सोडून तुला पुन्हा जन्म घ्यावा लागला. क्रोधाने कमाविता येत नाही तर गमाविले जाते.’’ चंडकौशिक या बोलण्याने भारावून गेला आणि त्याने महावीरांची क्षमा मागितली. त्या दिवसापासून त्याच्या वृत्तीत फरक पडला
===========================================
तात्पर्य- क्रोध ही तामसी वृत्ती आहे तर जीवनाचा आनंद सात्विकतेत आहे. रागाचा त्याग करणे हे मानवी जीवनाचे भूषण आहे.
==============
वर्तमानपत्रातून संग्रहित
==============
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा