एक जुनी सूफी कथा आहे. एकदा एक मोळीविक्या जंगलात नेहमीप्रमाणे झाडे तोडण्यासाठी गेला. त्याला एक साधू भेटला. तो म्हणाला, अरे इथेच का थांबलास आणखी पुढे जा. जीवनात नेहमीच पुढे जात राहावे. मोळीविक्या म्हातारा झाला होता. तो म्हणाला, महाराज मला आता कुठे पळवता. मी कुठेही जाऊ शकणार नाही. साधू म्हणाला, बघ तुझाच फायदा आहे. पुढे जा. पुढे जा.. असे म्हणत तो साधू अदृश्य झाला. मोळीविक्याला नवल वाटले. साधूने सांगितल्याप्रमाणे करायचे ठरवत तो पुढे गेला. त्याला तांब्याची खाण सापडली. तो आनंदी झाला. त्यातील तांबे विकून तो चरितार्थ चालवू लागला. कालांतराने त्याला पुन्हा साधूचे शब्द आठवले. तो पुन्हा पुढे गेला. त्याला चांदीची खाण सापडली. तो आणखी खुश झाला. त्याचे वर्ष मजेत सरले. त्याला पुन्हा वाटले आणखी पुढे जावे. त्याने असे केले असता, त्याला सोन्याची खाण मिळाली. तो खुश झाला.वर्षभर कमावल्यानंतर तो पुन्हा पुढच्या प्रवासाला निघाला. त्याला हि-याची खाण मिळाली. तो आणखी आनंदी झाला. आता त्याच्या सात पिढ्या बसून खातील इतके धन त्याच्याकडे जमा झाले होते. पुन्हा त्याला साधू भेटला. साधू म्हणाला, अरे का थांबलास? पुढे जा आणखी. तो मोळीविक्या त्या साधूला म्हणाला, आता मला हि-याची खाण मिळाली आहे. मला काही नको. परंतु, त्या साधूने पुन्हा त्याला पुढे जाण्याचा आदेश दिला. तो मोळीविक्या पुन्हा पुढे गेला. त्याला एक गुहा दिसली. या गुहेत एक साधू तपश्चर्या करत होता. आपल्याला नेहमी भेटणारा तो हा साधू नाही हे मोळीविक्याच्या ध्यानात आले. मोळीविक्या खुश झाला. या गुहेतील वातावरण त्याला आवडले. तो म्हणाला, आता मला काही नको. मी इथून कुठेही जाणार नाही. मला जितके जगायचे तितके मी जगलो. आता हाच माझा आसरा. त्या साधूने मोळीविक्याच्या मनातील ही बाब हेरली. तो जोरात ओरडला. तुला सांगितले ना, इथे थांबू नकोस. तुला आणखी पुढे जायचे आहे. थेट परमात्मा मिळेपर्यंत पुढे. तू चालत राहा, निघ इथून. त्या मोळीविक्याला स्वत:ची चूक कळली. पहिल्यांदा भेटलेल्या साधूने परमात्म्याचे मिलन करण्याविषयी पुढे जाण्यास सांगितले होते. परंतु, आपण तर केवळ भौतिक सुखाचाच विचार करत पुढे जात असल्याचे मोळीविक्याच्या लक्षात आले. त्याने त्या साधूची माफी मागितली व तो पुढच्या प्रवासाला निघाला.
bahot khub , ati sunder , sabko padhani chahiye aisi kathye hain. dhanyavad.
उत्तर द्याहटवाthanks ambrose chettiar,
उत्तर द्याहटवा