सोमवार, १२ ऑगस्ट, २०१३

(तृप्तता)

कथा क्र. 121

प्राचीन काळी एका देशात एक राजा राज्‍य करत होता. त्‍याचा असा एक नियम होता की जोपर्यंत तो अगणित संन्‍याशांना दान करीत नाही तोपर्यंत तो भोजन ग्रहण करत नसे. एके दिवशी दानासाठी निश्र्चित केलेल्या वेळेच्‍याआधीच एक संन्‍याशीबुवा आपल्‍या हातात एक छोटेसे भिक्षापात्र घेऊन राजवाड्याच्‍या द्वाराशी हजर झाले. राजाला हे पाहून आश्र्चर्य वाटले. संन्‍याशाने राजाला पाहिले व तो म्‍हणाला, '' हे राजन, जर तुम्‍हाला शक्‍य असेल तर माझ्या या छोट्याशा भिक्षापात्रात काही ना काही दान टाका.'' राजाला त्‍याच्‍या बोलण्‍याचा रागही आला आणि आश्र्चर्यही वाटले. राग यासाठी की राजाला तो तुम्‍हाला शक्‍य नाही असे सुचवित होता आणि भिक्षापात्राचा आकार खूपच लहान होता याचे आश्र्चर्य वाटले. राजाने आपल्‍या सेवकांना आज्ञा केली की या भिक्षुकाचे लहानसे भिक्षापात्र आताच्‍या आता सोन्याच्‍या मोहोरांनी भरून टाकावे व सन्‍मानाने याचकाची बोळवणी करावी. सेवकांनी पहिल्‍यांदा ताट भरून सोन्‍याच्‍या मोहोरा आणल्‍या आणि भिक्षापात्रात टाकल्‍या पण भिक्षापात्र मात्र मोकळेच. परत परत सेवक ताटे भरून सोन्‍याच्‍या मोहोरा आणत होते पण भिक्षापात्रात मात्र जागा होतच होती. राजाला व सेवकांना हा प्रकार काही कळेना की हे निश्र्चित काय होते आहे की आपण टाकलेल्‍या मोहोरा जातात कुठे आणि हे लहानसे भिक्षापात्र अजूनही मोकळे कसे दिसते. शेवटी सोन्‍याच्‍या मोहोरा संपल्‍या, राजाचा खजिना रिता झाला तरी भिक्षापात्रात थोडी जागा शिल्‍लक होतीच. मग राजाला समजून चुकले की हा काही तरी दैवी प्रकार आहे. त्‍याने संन्‍याशापुढे लोटांगण घातले आणि माफी मागितली व म्‍हणाला,''हे साधूमहाराज, मला क्षमा करावी, मी संपत्ती व सत्तेच्‍या गर्वात तुम्‍हाला व तुमच्‍या भिक्षापात्राला लहान समजलो. मी दान करतो हा माझा गर्व आता पूर्णपणे नष्‍ट झाला आहे. पण या भिक्षापात्राचे रहस्‍य काय आहे हे कृपया मला सांगावे.'' संन्‍याशी उत्तरला,'' राजा, हे भिक्षापात्र म्‍हणजे आपल्‍या हृदयाचे प्रतिक आहे. या संसारातील कोणतीच वस्‍तू पूर्णपणे आपले हृदयात जागा बनवू शकत नाही. मनुष्‍याने कितीही नाव कमावले, शक्ति मिळविली, धन प्राप्ती केली, सौंदर्य पाहिले किंवा उपभोगले, सुख प्राप्त केले तरी हृदयातून कुठेतरी असे वाटत राहतेच की अजून मिळाले पाहिजे. पूर्ण तृप्तता कधीच मिळत नाही. फक्त ईश्र्वरी कृपेचा एक किरण आपल्‍या हृदयाला भरू शकतो पण मनुष्‍य तो मिळविण्‍याचा कधीच प्रयत्‍न करत नाही.

तात्पर्य- तृप्तता हि खरी मानवाची गरज आहे पण ती मिळत नाही हे एक दुःख आहे. 

संग्रहित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा